अपघाताची शक्यता : प्रशासनाचे दुर्लक्षअहेरी : येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर रेती टाकली असल्याने येथून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर रेतीमुळे अनेकजण घसरून पडल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील रेती, मुरूम त्वरित हटवावे, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांकडून होत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मधील व्यंकटेश श्रीरामवार यांच्या घरासमोर दोन महिन्यांपासून रेतीवजा मुरूम टाकण्यात आला. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही सदर रेती हटविण्यात आली नाही. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह सायकलस्वार नियमित ये- जा करीत असतात. संपूर्ण रस्त्यावर रेती पसरल्याने दुचाकी वाहन अथवा सायकल घसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय रेतीमुळे दोन्ही बाजुच्या नाल्या पूर्णत: बुजलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यासही अडथळा येत आहे. येथील दोन्ही बाजुंच्या नाल्यांचा उपसा करून सांडपाण्यास मार्ग मोकळा करून द्यावा, वॉर्डात स्थानिक प्रशासनाने फवारणी करावी तसेच नगर पंचायत प्रशासनाने सदर रेती त्वरित हटवावी, अशी मागणी वॉर्ड क्रमांक ३ मधील नागरिकांकडून केली जात आहे.
दोन महिन्यांपासून अहेरीतील रस्त्यावर रेती
By admin | Updated: November 23, 2015 01:22 IST