जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी दोन टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक आशा स्वयंसेविकासुद्धा रिंगणात उतरल्या आणि काहींनी यात विजयसुद्धा मिळविला, परंतु शासकीय धोरणानुसार ग्रामपंचायत सदस्य अथवा अाशा स्वयंसेविका यापैकी एकाच पदावर राहता येत असल्याने त्यांना स्वेच्छेने एक पद सोडणे गरजेचे होते. परंतु निकालानंतर जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटुनही ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या आशा स्वयंसेविकांनी आपली इच्छा प्रशासनासमोर जाहीर न केल्याने गावातील लोक संभ्रमावस्थेत आहेत. अहेरी तालुक्यात एकूण सहा ग्रामपंचायतमध्ये आशा सेविकांनी विजय प्राप्त केला. यात मेडपल्ली व मरपल्ली येथील आशा स्वयंसेविकांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने तिथे आगामी पोटनिवडणूक होणार आहे. तेथे नवीन उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे. परंतु आणखी चार ग्रामपंचायतीत विजयी आशा स्वयंसेविकांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने प्रशासन व गावातील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. ग्रा.पं. सदस्य बनलेल्या आशांनी आपली भूमिका प्रशासनाला कळविली तर गावात पुढील पोटनिवडणूक होईल किंवा नाही याची माहिती प्रशासनाला व जनतेला देता येईल किंवा एखाद्या गरजू महिलेला आशा स्वयंसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळेल, परंतु आरोग्य विभागाने पत्र दिल्यानंतरही आशांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकरण पुन्हा जटील हाेत आहे.
जि.प.
अहेरी तालुक्यातील ४ गावांमध्ये आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणार की स्वयंसेविकाचे पदभार सोडणार याबाबत गावात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र जवळपास दोन महिने उलटूनही जिल्हा प्रशासन याबाबत कोणताही निर्णय देत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्य बनलेल्या आशांनी कुठल्यातरी एका पदाचा राजीनामा दिला असता चित्र स्पष्ट झाले असते. सरपंच निवडणुकीचा निकाल काही ग्रामपंचायतीत वेगळ्या स्वरूपाचा लागला असता, परंतु सरपंच पदाची निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत सदस्य पदावर कायम राहतील की पुन्हा आशा स्वयंसेविकांचा पदभार सांभाळतील याबाबत चर्चा रंगू लागलेली आहे. परंतु या सर्व प्रकरणाकडे आता जिल्हा परिषेदच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.