गडचिरोली : वीज कंपनीच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात १६८ नवीन रोहीत्र मंजूर केले असून सदर रोहीत्र लवकरच लावले जाणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर अहेरी तालुक्यातील लगाम बोरी येथे पाच एमव्हीएचे वीज उपकेंद्र बसविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ८९९ रोहित्र आहेत. जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत रोहित्रांची संख्या अत्यंत कमी आहे. एका रोहित्रावरून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या गावांना विजेचा पुरवठा केल्या जातो. परिणामी रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झाल्यास तो दुरूस्त करणे अशक्य होते. त्याचबरोबर तेवढ्या दूर विद्युत लाईन टाकली जात असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही अधिक राहते. राज्याच्या इतर जिल्ह्यात गाव तिथे रोहीत्र बसविण्यात आले आहे. मात्र गडचिरोली जिल्हा याला अपवाद ठरला असून पाच ते सहा गावांना मिळून एक रोहीत्र बसविण्यात आले आहे. विद्युत रोहित्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने लावून धरण्यात येत होती. त्यानुसार वीज कंपनीने पायाभूत आराखडा भाग-२ अंतर्गत १६८ रोहीत्र मंजूर केले आहेत. यातील ५५ रोहित्र चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या पाच तालुक्यात बसविले जाणार आहेत. वीज वितरण कंपनीच्या या निर्णयामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.रोहीत्र बसविण्याबरोबरच अहेरी तालुक्यातील लगाम बोरी येथे पाच एमव्हीए क्षमतेचे वीज उपकेंद्र बसविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याची विजेची मागणी दरवर्षी वाढतच चालली आहे. त्यामुळे कार्यरत विद्युत वाहिन्यांवर भार वाढत चालला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी १३५ किमी उच्च दाबाच्या वाहिनीचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर ५५ किमी नवीन लघुदाब वाहिनी टाकली जाणार आहे. या नवीन वाहिन्यांमुळे विजेची समस्या कमी होण्यास फार मोठी मदत होण्याची आशा निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
१६८ ठिकाणी लागणार रोहित्र
By admin | Updated: June 27, 2015 02:06 IST