कृषीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने अनेकजण यंत्राचा वापर करून शेती कसतात. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात हाेती. परंतु बैल राखण्यासाठी गुराखी मिळेना व बैलांच्या संगाेपनाचा प्रश्न यासारख्या समस्यांमुळे अनेकांनी बैलांची विक्री केली. केवळ दुग्ध उत्पादनासाठी अनेक शेतकरी गाई पाळतात. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून हंगामातील कामे ट्रॅक्टरने करीत आहेत. अनेक गावात ट्रॅक्टरची संख्याही वाढली आहे. ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे. ट्रॅक्टरवर मजुरांनाही काम मिळाले आहे.
तालुक्यात धान लागवड भरपूर प्रमाणात केली जाते. परंतु दरवर्षी काही ना काही संकट बळीराजासमोर येते. वैनगंगा नदीला आलेला पूर असो की येणारे वादळ आणि गारा पडल्याने धानाचे नुकसान असो, अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागताे. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसताे. मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागताे.
(बॉक्स)
डिझेल दरवाढीचा फटका
सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रती तासाचे भाडेही वाढले आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येते.