कडेकोट व्यवस्था : तीन विधानसभा मतदार संघात ७३६ केंद्रांवर निवडणूक यंत्रणा झाली सज्जगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात ३६ उमेदवार भाग्य अजमावित आहे. यामध्ये सात महिला उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचा फैसला ७ लाख ३१ हजार १०५ मतदार उद्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान करणार आहेत.मतदानासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान चालणार असून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्वाधिक १४ उमेदवार आरमोरी विधानसभा क्षेत्रात असून १३ उमेदवार गडचिरोली मतदार संघात तर ९ उमेदवार अहेरी विधानसभा मतदार संघात रिंगणात आहेत. जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहूजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, फारवर्ड ब्लॉक या प्रमुख पक्षासह अपक्ष उमेदवारही निवडणूक लढत आहे. सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती असल्याने मतदारांचाही यावेळी मोठा कस मतदानासाठी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार नवीन मतदारांची नोंदणीही जिल्ह्यात झालेली आहे. त्यामुळे हे मतदार उद्या पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकटीकरणाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मतदारांना केले आहे. (प्रतिनिधी)
सात लाख मतदार गाजवणार मतदानाचा हक्क
By admin | Updated: October 14, 2014 23:17 IST