मुख्याध्यापकांची उपस्थिती : शाळा प्रगत करण्याचे आवाहन देसाईगंज/मोहटोला : देसाईगंज येथे शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत देसाईगंज तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा शिक्षणाधिकारी यांनी घेतला. आढावा बैठकीला शिक्षणाधिकारी माणिक साखरे, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, आर. व्ही. आकेवार, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, उपशिक्षणाधिकारी नीलकंठ चावरे आदी मान्यवर उपस्थित होते. देसाईगंज तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत विस्ताराने लहान आहे. त्याचबरोबर सदर तालुका अगोदरच प्रगतही आहे. शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या तालुक्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्यात फारशी अडचण जाणार नाही, सदर तालुका प्रगत झाल्यास जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी हा तालुका मार्गदर्शक ठरेल. यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच शिक्षकांनी या तालुक्याला प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक शाळा अगोदरच प्रगत आहेत. सर्व शाळांमध्ये ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन केल्यास शाळा प्रगत होण्यास वेळ लागणार नाही, असे मार्गदर्शन केले. सभेदरम्यान पायाभूत चाचणी, ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, शाळासिद्धी उपक्रम, स्वच्छ भारत विद्यालय, हातधूवा मोहीम, शालेय पोषण आहार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांची फलनिश्चिती, वैैज्ञानिक दृष्टीकोन, जनजागृती आदीबाबत मार्गदर्शन केले. सदर सभेकरिता केंद्रप्रमुख, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे प्रमुख, विषयसाधनव्यक्ती, विषयतज्ज्ञ, फिरते विशेष शिक्षक उपस्थित होते. डिसेंबरपूर्वी जिल्ह्यातील सर्वच शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट असल्याने या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. (वार्ताहर)
शैक्षणिक प्रगतीचा आढावा
By admin | Updated: July 25, 2016 01:41 IST