१ पासून आंदोलन : तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारागडचिरोली : महसूूल कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र महसूल कर्मचारी संघटनेच्या निवेदनाची शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने १ मे पासून जिल्हास्तरावर साखळी उपोषण संघटनेमार्फत केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने २६ मागण्यांचे निवेदन फेब्रुवारीत शासनाला सादर करण्यात आले. जिल्ह्यातील पदोन्नती नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक-टंकलेखक, वाहनचालक, शिपाई व कोतवाल यांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागण्यांवर शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने जिल्हास्तरावर साखळी उपोषणाला १ मे रोजी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रारंभ केला जाणार आहे. यात तालुका, उपविभाग, जिल्हास्तरावरील संपूर्ण महसूल कर्मचारी सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एस. के. बावणे, के. एम. कोटांगले, डी. एम. वाकुलकर व महसूल कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महसूल कर्मचारी करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 01:27 IST