शासनाकडून मुदतवाढ नाही : ग्रामपंचायतस्तरावरील कामे रखडली देसाईगंज : मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींना विविध कामे करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधी खर्चाची अंतिम मुदत ३० जुलै २०१६ होती. यानंतर शासनाने निधी खर्चासह मुदतवाढ दिली नाही. तालुक्यात अनेक ग्रा. पं. ची बीआरजीएफची कामे अपूर्ण असल्याने अखर्चित लाखो रूपयांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे. सन २०१५-१६ वर्षात ग्रामपंचायतींना बीआरजीएफची कामे करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत शासनाकडे निधी मिळाला होता. अनेक कामे अपूर्ण राहिल्याने सदर निधी खर्चास शासनाने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली होती. मात्र ३० जुलै २०१६ रोजी निधी खर्चाची मुदत संपली असून यापुढे शासनाने बीआरजीएफ कामाच्या निधी खर्चास मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे अपूर्ण असलेली ग्रामपंचायतस्तरावरील अनेक कामे रखडणार आहेत. बीआरजीएफच्या कामासाठी शासनाकडून मिळालेल्या निधी खर्चास मुदतवाढ मिळावी, यासाठी पंचायत समितीस्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला. मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखर्चित शिल्लक निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
बीआरजीएफचा अखर्चित निधी परत जाणार
By admin | Updated: August 1, 2016 01:23 IST