गडचिराेली : सेवानिवृत्त हाेणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीच्या लाभासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्तीचे सर्वच लाभ दिले जावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली हाेती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या दिवशीच आता सर्व लाभ दिले जात आहेत. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे २५ सप्टेंबर राेजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. याबाबतचे निवेदनसुद्धा दिले. निवेदनाची दखल घेत सीईओ यांनी शिक्षकांच्या समस्या साेडविण्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक केली. दर १५ दिवसांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. शिक्षकांकडून प्रस्ताव मागितले. प्रस्तावावरील त्रुटीसुद्धा दूर करण्यात आल्या. ऑगस्ट २०२१ मध्ये सेवानिवृत्त हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे आताच मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, कार्याध्यक्ष नरेंद्र काेत्तावार, जिल्हा सरचिटणीस रमेश रामटेके, याेगेश ढाेरे, गणेश काटेंगे, राजेश बाळराजे, अशाेक दहागावकर, राेशनी आखाडे, लक्ष्मण गद्देवार, संजीत सरकार, डम्बेश पेंदाम, जयंत राऊत, राजेंद्र भुरसे, खिरेंद्र बांबाेळे, पुरुषाेत्तम पिपरे यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला हाेता.
बाॅक्स....
७२५ शिक्षक झाले नियमित
९९ वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजूर करण्यात आली. ७२५ शिक्षकांना नियमित, २३२ शिक्षकांना स्थायी करण्यात आले आहे. चटाेपाध्याय वेतनश्रेणीची २५४ प्रकरणे मंजूर केली आहेत. विशेष म्हणजे ही प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित हाेती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकरणे तात्काळ मंजूर झाली आहेत.