सिराेंचा : यावर्षी जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया जाचक अटी व शर्तींमुळे पार पडू शकली नाही. एकाही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी घरकुल व इमारत बांधकामे प्रभावित झाली आहेत. दुसरीकडे राेजगार व आर्थिक मिळकत बुडाल्याने ट्रॅक्टर मालक, चालक व मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. सिराेंचा तालुका हा नद्यांचा तालुका म्हणून ओळखला जाताे. मात्र, रेतीघाटांच्या लिलावाअभावी तालुक्यात रेतीची टंचाई भासत आहे. शासनाच्या आडमुठ्या धाेरणाचा रेती तस्कर फायदा घेत आहेत. लिलाव प्रक्रिया न झाल्याने तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले आहे. सिराेंचा तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांमधील रेतीला माेठी मागणी आहे. मात्र, पर्यावरण विभागाच्या आडकाठीमुळे शासनाला रेती घाटातून मिळणारा महसूल बुडाला आहे.
याचा परिणाम तालुक्यातील विकासकामांवर झाला आहे. घरकुल व इतर इमारत बांधकामासाठी रेतीची नितांत आवश्यकता आहे. मात्र, लिलाव न झाल्याने रेती उपलब्ध हाेणे कठीण झाले आहे. अनेक बेराेजगार युवकांनी विविध बॅंका व पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केले. काही युवकांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत ट्रॅक्टर विकत घेतले. रेती वाहतुकीच्या धंद्यातून कर्जाचे मासिक हप्ते फेडण्याचे नियाेजन त्यांनी केले हाेते. मात्र, रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने ट्रॅक्टर मालक व चालकांचा राेजगार हिरावला आहे.