गडचिरोली : मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याबरोबरच पावसाची रिपरिपही काही भागात सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाच्या हलक्या तूर पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात तूर पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. अनेक शेतकरी डाळीसाठी या पिकाची लागवड आपल्या शेतात करतात. सध्य:स्थितीत शेतकऱ्यांच्या हलक्या तूर पिकावर फुलोरा आलेला आहे. उन्हाळ्यात लावलेल्या तूर पिकाला शेंगाही लागलेल्या आहेत. परंतु सर्वाधिक हलक्या तुरी फुलोऱ्यावर आहेत. त्यामुळे या ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकावर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. परिणामी जिल्ह्यातील तूर पीक ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे. तूर पिकासह इतर डाळवर्गीय पिकही ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाळ पिकाचा पेरा दरवर्षी शेतकरी करतात. दुर्गम भागासह ग्रामीण भागात तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे तूर पिकाचे संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तूर पिकासह वालवर्गीय पिकांना सध्या फुलोरा चढला आहे. त्यामुळे ऐन फुलोऱ्यावर ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. या वातावरणामुळे फुलोरा पूर्णत: जळून गळतो. त्यानंतर पुन्हा त्याजागी फूल येत नाही. परिणामी पिकाच्या एकूणच उत्पादनावर परिणाम होतो. दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळेही डाळवर्गीय पिकाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतित आहेत. तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता या काळात नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यात तूर पिकाची लागवड शेतकरी करतात. मात्र या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे तूर पिकाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)
ढगाळ वातावरणाचा तूर पिकावर परिणाम
By admin | Updated: October 26, 2014 22:40 IST