लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा कामगार कल्याण मंत्रालयाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी अजूनपर्यंत याबाबत शासनाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या योजनेमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुखकर होण्यास मदत मिळणार आहे.
बांधकाम कामगारांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे होऊ शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. वृद्धापकाळात बांधकाम कामगारांची परवड होऊ नये यासाठी त्यांना निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कामगारांना सदर निर्णयाची अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. याकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात दरवर्षी कामगारांची नोंदणी वाढत आहे.
नोंदणी कशी करणार?इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाइटला भेट देऊन तेथे आवश्यक माहिती भरावी, तसेच कागदपत्रे अपलोड करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येते. सेतू केंद्रात जाऊन नोंदणी करावी.
केव्हा, किती मिळणार लाभ ?बांधकाम कामगारांना ६० वर्षे वयानंतर निवृत्तिवेतन मिळणार आहे. कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तिवेतन दिले जाणार आहे.
कामगारांना अन्य लाभ काय?कामगारांना सुरक्षा पेटी संच तसेच किचन संचाचा लाभ दिला जातो. याशिवाय विविध योजनांचा लाभ दिला जातो. या लाभांमध्ये घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अपघात विम्याचा लाभ व अन्य योजनांचा समावेश आहे.
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्तिवेतनइमारत बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा.
४६ हजार जिल्ह्यात १३ हजारांवर सक्रीय कामगार आहेतबांधकाम कामगारांची नोंदणी आहे. दरवर्षी नोंदणी संख्या वाढत आहे. सुरक्षा किट, किचन संच व विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने अनेकजण नोंदणी करतात.
कालावधीनुसार मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभकामगारांना १० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५० टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी ६ हजार, १५ वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्के मर्यादेत प्रतिवर्षी ९ हजार निवृत्तिवेतन दिले जाईल. २० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी १२ हजार रुपये एवढे निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे.