गौण खनिज स्वामित्वधन वसुली : ३० कोटी महसुलाचे शासनाचे उद्दिष्टगडचिरोली : सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, परमिट तसेच रेती परमिट व रॉयल्टीमधून एकूण ९ कोटी ५४ लाख २२ हजार ७५६ रूपयांचा महसूल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर गौण खनिज स्वामित्वधन वसुलीची टक्केवारी ३१.८१ आहे. गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्याची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय गिट्टी, मुरूम, माती, दगडाच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे तसेच रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित कंत्राटदाराला आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन परवाना घ्यावा लागतो. त्यानंतरच सदर कंत्राटदार आपल्या विशिष्ट क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक नियमानुसार करीत असते. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला लीज व परमिट घ्यावा लागतो. यासाठी विविध विभागाकडून जिल्हा खनिकर्म विभागाला महसूल प्राप्त होत असतो. राज्य शासनाने सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाला गौण खनिज स्वामित्वधन वसुलीबाबत ३० कोटींचे उद्दिष्ट दिले आहेत. १२ तालुक्यातील ६ उपविभाग मिळून आतापर्यंत एकूण ९ कोटी ५४ लाख २२ हजार रूपयांचा महसूूल मिळाला आहे. स्वामित्वधन वसुलीत गडचिरोली तालुका आघाडीवर असून अहेरी तालुक्यासह अहेरी उपविभागातील पाचही तालुके वसुलीत माघारले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
नऊ कोटींचा महसूल प्राप्त
By admin | Updated: November 2, 2016 01:25 IST