कुलगुरूंचे प्रतिपादन : रजत राऊतचा गडचिरोलीत सत्कार गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास भागात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात जाऊन रजत रोहिदास राऊतने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रजतचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगरातील सम्यक बुद्ध विहाराच्या प्रांगणात गुरूवारी रजत राऊतचा सत्कार झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, न. प. चे शिक्षण सभापती विजय गोरडवार, लेखक डॉ. बाबू कऱ्हाडे, रजतचे वडील रोहिदास राऊत, आई अरूणा राऊत, नगरसेविका मिनल चिमुरकर, संध्या उईके आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना रजतने मी अमेरिकेत असलो तरी गडचिरोली व भारताच्या मातीशी माझे ऋणानुबंध राहतील, असे सांगितले. प्रास्ताविक जगन जांभुळकर, संचालन रवींद्र पटले तर आभार गौतम मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमात सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारिप बहुजन महासंघ, महिला आघाडी, आंबेशिवणी येथील बौद्ध नागरिकांनी रजतचा सत्कार केला. (नगर प्रतिनिधी)
रजतचे यश जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार
By admin | Updated: January 16, 2016 01:52 IST