भामरागड तालुक्यात अतिवृष्टी : रेगुंठा-टेकडा-बेजुरपल्ली मार्ग बंदगडचिरोली : जिल्हाभर वरूणराजाची कृपादृष्टी झाली असून शनिवारी रात्रीपासून तर रविवारी दिवसभर जिल्हाभरात संततधार पावसाने झोडपले. सर्वाधिक भामरागड तालुक्यात पाऊस पडला असून या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसामुळे गडचिरोली शहरातील तसेच खेडेगावातील खोलगट भागात पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. शनिवारी रात्रीपासून ते रविवारपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ४३.८ मिमी पाऊस झाला आहे. धानोरा तालुक्यात ४०.२ मिमी, चामोर्शी ७२.० मिमी, मुलचेरा तालुक्यात ५९.०४ मिमी, देसाईगंज तालुक्यात २५.५ मिमी, आरमोरी ३१.८ मिमी, कुरखेडा ३३.० मिमी, कोरची ३२.२ मिमी, अहेरी ४१.८ मिमी, एटापल्ली ८३.६ मिमी, भामरागड ११०.० मिमी, सिरोंचा ३१.६ मिमी पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाने शनिवार रात्रीपासून तर रविवारपर्यंत ६०४.९ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. या पावसाची सरासरी ५०.४ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०२.८ पाऊस झाला असून त्याची सरासरी ३००.२ आहे. संततधार पावसामुळे कठाणी, पर्लकोटा, वैनगंगा, खोब्रागडी व अन्य नद्या पाण्याने दुथळी भरून वाहत आहे. अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. नाल्याला पूर आल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा-टेकडा-बेजुरपल्ली मार्ग बंद झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हाभरात संततधार पाऊस
By admin | Updated: July 21, 2014 00:10 IST