कारवाई थंडबस्त्यात : ५० लाख रूपयांतून उभारले येर्रावागू नाल्यावरील पूलसिरोंचा : तालुक्यातील अंकिसा-आसरअल्ली दरम्यानच्या मार्गावर असलेल्या येर्रावागू नाल्यावर गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ५० लाख रूपयांच्या निधीतून पूल उभारण्यात आला. दरम्यान पहिल्याच मुसळधार पावसाने नाल्याच्या पात्रात पाण्याचा दाब वाढल्याने सदर पूल पाण्याने वाहून गेला. परिणामी सदर बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याची प्रचिती येते. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत अंकिसा-आसरअल्ली मार्गावर असलेल्या येर्रावागू नाल्यावर पूल बांधकाम मे २०१४ रोजी पूर्ण करण्यात आले. पुलाच्या या बांधकामावर ५० लाख रूपये खर्च झाला आहे. सदर पूल जून व जुलै २०१४ मध्ये झालेल्या पावसामुळे वाहून गेला. अर्धा पूल वाहून गेल्यामुळे सदर रस्ता बंद झाला होता. त्यानंतर नागरिकांनी श्रमदानाने या पुलाची किरकोळ दुरूस्ती करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा २०१५ च्या जून महिन्यात झालेल्या मृगनक्षत्राच्या पहिल्या पावसाने सदर पूल वाहून गेला. सदर पुलाच्या बांधकामाच्या चौकशीच्या मागणीसाठी आसरअल्लीतील काही राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र निकृष्ट बांधकामासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी तशीच कारवाई करण्यात आली नाही. ५० लाख रूपयांचा खर्च करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने जोरदार पाऊस झाल्यावर या परिसरातील नागरिकांचा सदर मार्ग बंद होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पावसाने दोन महिन्यांतच पूल वाहून गेला
By admin | Updated: July 1, 2015 01:48 IST