देयकासाठी लाच : धानोरा रूग्णालयाचा सहा. अधीक्षकगडचिरोली : धानोरा ग्रामीण रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक अधीक्षकांनी लाचेची मागणी केली. यापैकी सहाय्यक अधीक्षक प्रशांत बलवंत हेमके (४५) याला गडचिरोली येथील आयटीआय चौकात मोटार सायकल दुरूस्तीच्या दुकानासमोर लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.चंद्रपूर येथील विक्रांत कमलकिशोर जाजू यांनी ग्रामीण रूग्णालय धानोरा येथील डेंटल चेअर, स्केलर मशीन व कॉम्प्रेसर मशीनची दुरूस्ती केली. त्याचबरोबर सर्जीकल साहित्याचा पुरवठा केला. याचे ३९ हजार २२ रूपयाचे बिल झाले. सदर बिल मंजूर करण्यासाठी प्रशांत बलवंत हेमके याने एकूण रक्कमेच्या १५ टक्के प्रमाणो ५ हजार ८५0 रूपयाची लाच मागितली. आपल्याच मेहनतीचे पैसे मिळण्यासाठी एखाद्या लाचखोर सरकारी अधिकार्याला कमिशन द्यावे लागावे, ही बाब विक्रांत यांना पटली नाही, असे लाचखोर जेरबंद झाल्याशिवाय या भ्रष्टाचार्यांना अद्दल घडणार नाही. ही बाब लक्षात घेऊन विक्रांत जाजू यांनी या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांकडे केली. त्यानुसार गडचिरोली व चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचार्यांनी सापळा रचला. प्रशांत हेमके याला ५ हजार रूपयाची लाच घेतांना गडचिरोली येथील आयटीआय चौकातील मोटर सायकल दुरूस्तीच्या दुकानासमोर रस्त्यावरच रंगेहाथ पकडले. सदर कारवाई पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते, पोलीस उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक व्ही. पी. आचेवार, पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, सहकारी पोलीस हवालदार चंद्रशाह जीवतोडे, गजानन येरोकर, शंकर मांदाडे, संदीप वासेकर, मनोज पिदुरकर, सुभाष गोहकर, विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, परिमल बाला, रवींद्र कत्रोजवार, नरेश आलाम, चालक उमेश मासुरकर यांनी केली आहे. रात्री उशीरापर्यंत प्रशांत बलवंत हेमके याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांकडून चौकशी करण्यात येत होती. (नगर प्रतिनिधी)
लाचखोर जाळ्यात
By admin | Updated: June 5, 2014 23:59 IST