वैरागड : मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती. त्याही संकटातून रबी पिके सावरल्यानंतर आता रबी पिके शेवटच्या टप्यात असताना आज रविवारी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरासह आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी आदी तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या अर्ध्या भागात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे यंदा रबी पिके अस्मानी संकटात सापडली आहेत. यावर्षातील खरीपाच्या हंगामासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने धानपट्ट्यात अपेक्षीत उत्पादन झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा खरीप पिकांना झाला. याशिवाय त्या पावसाचा फायदा रबी पिकांच्या पेरणीसाठीही झाला. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यात भूईमुंगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा खरीपासारखेच रबी पिके मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणार, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा केली होती. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी तूळ, जवस, हरभरा, कोशिंबिर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे रबीचे सदर पीक पूर्णत: काळवंडून गेली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे किटकनाशक खरेदी केले. या किटकनाशकाची रबी पिकांवर फवारणी केली. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे रबी पिकांवर परिणाम झाला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला. (वार्ताहर)
जिल्ह्यातील रबी पिके अस्मानी संकटात
By admin | Updated: March 2, 2015 01:20 IST