कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यातील घाटी येथील शासकीय आमश्रशाळेला भेट दिली असता, या आश्रमशाळेतील सोलर वॉटर हीटर धूळखात पडून असल्याचे दिसून आले. अशा प्रकारचे शेकडो सोलर वॉटर हीटर बंद स्थितीत आहेत. यामुळे कोट्यवधी रूपयांचे शासनाने नुकसान झाले असून हा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला जाईल, अशी माहिती आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली आहे.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने प्रत्येक शासकीय आश्रमशाळेला सोलर वॉटर हीटर उपलब्ध करून दिले. मात्र बहुतांश शाळांमधील वॉटर हीटर सुरूच झाले नाही. या वॉटर हीटरवर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. वापराअभावी सदर वॉटर हीटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. हा गंभीर प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपण विधीमंडळात करणार आहोत, अशी माहिती आ. क्रिष्णा गजबे यांनी दिली. आश्रमशाळेला भेटीदरम्यान त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व आहार देण्याचे निर्देश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. यावेळी शाळेच्या समस्यांबाबत गावातील नागरिकांशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, जिल्हा सचिव तथा पं. स. सदस्य चांगदेव फाये, तालुका संघटक जलालभाई सय्यद, रामहरी उगले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते व घाटी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
सोलर वॉटर हीटरचा प्रश्न विधिमंडळात उचलणार
By admin | Updated: June 20, 2015 02:19 IST