विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे, मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदरीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे.
कैकाडी वस्तीत सुविधा केव्हा देणार?
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.
शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजुला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही. त्यामुळे अंत्यसंस्करासाठी अनेक अडचणी येतात.
पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी.
तलाठी व ग्रामसेवकांची वानवाच
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता
एटापल्ली : एटापल्ली हा विस्ताराने अतिशय मोठा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे १९८ गावे आहेत. केवळ कसनसूर व एटापल्ली या दोनच ठिकाणी बँका आहेत. एटापल्ली येथे एसबीआय, सहकारी बँक व ग्रामीण बँकेची शाखा आहे. तालुक्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अजूनही बहुतांश नागरिकांना बँकेचे आर्थिक व्यवहार माहीत नाही.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी दिल्यास नागरिकांसाठी सोयीचे होईल.
कुंपनाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा
आष्टी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यांवर २० ते २५ मोकाट जनावरांचा कळप दिवसभर बसून राहतो. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आष्टीच्या मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. चौकातून गडचिरोली, अहेरी, गोंडपिपरी येथून वाहने येतात.