गडचिरोली : शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे मॉडेल कॉलेज सुरू केले. सुरूवातीला रातूम नागपूर विद्यापीठांतर्गत असलेल्या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. या मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी रातूम विद्यापीठाला शासनाकडून अडीच कोटी रूपयाचा निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र जागेअभावी सदर मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. जागेचा प्रश्न कायम आहे.गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने २०११ मध्ये गडचिरोली येथे मॉडेल कॉलेजला मान्यता प्रदान केली. त्यानंतर १ जुलै २०११ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत सदर मॉडेल कॉलेज सुरू करण्यात आले. मॉडेल कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्यावर्षी बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए. आदी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यात आले. दुसऱ्या वर्षी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी पटसंख्येत वाढ झाली. सन २०१३-१४ गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडून रातूम नागपूर विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीत असलेल्या मॉडेल कॉलेजला कुलूप ठोकण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सदर मॉडेल कॉलेज बंद झाल्याचा संदेश जाऊन यंदा या मॉडेल कॉलेजमध्ये फार कमी प्रवेश झाले असल्याची माहिती आहे. त्यानंतर एकाच खोलीमध्ये सदर मॉडेल कॉलेज सुरू होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या प्रशासनात सदर मॉडेल कॉलेजच्या मालकी हक्कावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून शीतयुध्द सुरू आहे. सध्या स्थितीत मॉडेल कॉलेज आरमोरी मार्गावर गोगावनजीक असलेल्या खासगी शिक्षण संस्थेच्या इमारतीत भाडे तत्वावर सुरू आहे. बरेच प्रयत्न करूनही मॉडेल कॉलेज हस्तांतरीत करण्यात गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला अपयश आले. (स्थानिक प्रतिनिधी)
इमारतीसाठी जागेचा प्रश्न कायम
By admin | Updated: March 2, 2015 01:19 IST