आलापल्ली : अहेरी आगारापासून सात किमी अंतरावर आलापल्ली हे चौफर वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी जुने लहानशे बसस्थानक आहे. येथे मोठ्या बसस्थानकाची इमारत मंजूर करण्यात आली. मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही.आलापल्ली बसस्थानकावरून जवळपास १८ तास बसेस ये-जा करीत असतात. येथून हैदराबाद, शिर्डी, अमरावती, आकोट, वर्धा, लातूर, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, यवतमाळ आदी लांब पल्ल्याच्या जलद, निमआराम, साधारण बसेस तसेच मानव विकास मिशनच्या स्कूल बसेस धावतात. तसेच वर्धा, नागपूर आदी ठिकाणावरून सिरोंचा, चंद्रपूर, नागपूरकडे लांब पल्ल्याच्या बसेस सरळ धावतात. भामराग, एटापल्ली, मुलचेरा आदी अतिदुर्गम भागातील मार्गावरही आलापल्ली बसस्थानकावरून बसेस सोडल्या जातात. या ठिकाणी दिवसभर बसेस व प्रवाशांची वर्दळ असते. आलापल्ली येथे शासनाच्यावतीने बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही पक्क्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पाच तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आलापल्ली येथे बसस्थानक बांधकाम होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाचा विस्तार विभागीय कार्यालय झाल्यामुळे वाढणार आहे. त्यामुळे येथे नवे बसस्थानक होणे गरजेचे आहे.
आलापल्ली बसस्थानक इमारतीचा प्रश्न कायमच
By admin | Updated: March 30, 2015 01:30 IST