अहेरी : अहेरीपासून १२ किमी अंतरावर देवलमरी लगत व्यंकटापूर राज्य महामार्ग २७५ वरील मोठा पूल एका बाजूस वाकला आहे. त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूल बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. देवलमरीपासून व्यंकटापूर, कोत्तागुडम, लंकाचेन, अम्बेझरा, वट्रा सारख्या महत्त्वाच्या गावातून हा महामार्ग सिरोंचाकडे जातो. प्रसिद्ध व्यंकटापूर देवस्थानात दररोज शेकडो नागरिक दर्शनासाठी जात असतात. तसेच परिसरातील गावकरी विविध कामांसाठी, बाजार व शेती कामासाठी अहेरीला ये-जा करीत असतात. तसेच विविध कर्मचारी सुद्धा याच मार्गाने जात असतात. व्यंकटापूर येथे पोलीस उपकेंद्र असल्याने पोलिसांची याच पुलावरून ये-जा राहते. एसटीच्या बससह खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनेही याच मार्गाने जातात. वाकलेल्या पुलावरून हजारो जड वाहनांची वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक कोटी ३० लाख रूपये खर्चुन १२ वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत हा पूल वाकून गेला आहे. पुलाचे दोन पिलर डावीकडे सरकले आहे. मोठा पूर आल्यास हा पूल वाहून जाण्याची किंवा तुटण्याची शक्यता आहे. मागील वर्षी लोकमतने या पुलाला भेगा गेल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भेगा बुजविण्याचे थातुरमातून काम केले. हा पूल कधीही कोसळण्याची शक्यता असून या पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होण्याचीही स्थिती आहे. (प्रतिनिधी)
पुलाचा पिलर सरकला
By admin | Updated: May 23, 2015 02:01 IST