ग्रामीण भागामध्ये गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय व मुत्रीघराच्या बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याअनुषंगाने शासनाने बऱ्याच गावी शौचालये व मुत्रीघरे बांधलेली आहेत; पण गावातील लोकांची अजूनपर्यंत पाहिजे त्या पद्धतीने मानसिकता बनली नाही. अनेक स्त्री, पुरुष, लहान बालके उघड्यावरच शौचालयाला व लघवी करण्याकरिता जात असतात. त्यामुळे सार्वजनिक शौचालय व मुत्रीघराचा वापरच गावकरी करीत नसल्याने या इमारती बेवारस स्थितीत दिसून येत आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनसुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याने शासनाचे लाखो रुपये लावून बांधलेल्या इमारती दयनीय अवस्थेत आढळून आल्या आहेत. या इमारतीच्या अवतीभवती लहान मोठे झुडूप झाडाचे साम्राज्य तयार झाले असून, गावांतील लोक याच ठिकाणी कचरा आणून टाकत असतात. त्यामुळे या परिसरात सर्वत्र कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असते. सध्याची परिस्थिती बघता येणारी दुर्गंधी ही गावांमध्ये रोगराईला निमंत्रण दिल्यासारखी होईल. गावांतील काही सुज्ञ लोकांनी अनेकदा या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे मुद्दाम कानाडोळा करीत असल्याचे चित्र दिसत आहे.