गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना तहसील स्तरावरून पासची सोय उपलब्ध झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन तेथील शेतीची कामे करणे सोयीचे झाले होते. त्याच धर्तीवर महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना पास उपलब्ध करून दिल्यास परजिल्हातील शेती असलेल्या शेतकऱ्यांची जिल्हाबंदीची अडचण दूर होऊ शकते.
सध्या खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक उरले आहेत. त्यामुळे शेतातील कचरा जाळणे, शेतांच्या बांधाची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू आहेत, पण जिल्हाबंदी असल्याने परजिल्हात शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व कामांना फार महत्त्व आहे. ही कामे वेळेतच हाेणे आवश्यक आहेत. मात्र जिल्हाबंदी असल्याने ही कामे पडून राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होऊ शकतो. त्यामुळे किमान शेतकऱ्यांना सातबाराच्या आधारावर तहसील स्तरावरून पास देणे गरजेचे आहे.