आलापल्लीत काँग्रेस आक्रमक : भाजपविरोधात दिल्या घोषणाआलापल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राज्य सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक धोरणांचा आलापल्ली येथे रविवारी निषेध मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार आलापल्लीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सगुणा तलांडे यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२.३० वाजता गोंडमोहल्ल्यातून मोर्चाचा प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गाने ग्रामपंचायत, बसस्थानक मार्ग, वीर बाबुराव चौकातून मोर्चा काढून समारोप गोंडमोहल्ल्यात करण्यात आला. या मोर्चात भाजप नेतृत्वात सरकारचा निषेध तसेच पालकमंत्र्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुश्ताक हकीम, चंद्रकांत बेझलवार, सलीम शेख, गजानन झाडे, गिरमा मडावी, बिरसूभाले गावडे, शिला चौधरी, अरूणा गेडाम, लालूवंजा गावडे, मुन्नी अहमद शेख, महेंद्र जट्टे, तायर शेख, गीता मडावी, रमादेवी कंदीकुरवार, हाजराबानू शेख, रामप्रसाद मुंजमकर, अनिता कंदीकुरी, सुशिला बारी, विजया गिरी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) या आहेत मागण्यासूरजगाड लोह प्रकल्प एटापल्लीतच निर्माण करा, प्रकल्प इतरत्र हलविल्यास काँग्रेसतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, अहेरी विधानसभा क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करून पीक कर्जमाफी द्यावी, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रूपये भाव द्यावा, निराधारांना १ हजार ५०० रूपये मानधन द्यावे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव कमी करावे, पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, मेडीगट्टा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण द्यावे व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढला.
सरकारच्या धोरणांचा मोर्चातून निषेध
By admin | Updated: April 11, 2016 01:43 IST