ग्रा. पं. पातळीवरच प्रचार वाढला : स्थानिक उमेदवाराला निवडून देण्यावर भर द्यागडचिरोली : जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात अनेक मतदार संघ अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती प्रवर्ग व महिलांसाठी राखीव झाल्याने या तालुक्यातील अनेक राजकीय नेते दुसऱ्या तालुक्यात जाऊन निवडणुका लढत आहेत. तसेच अहेरी उपविभागातही अनेक मातब्बर आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. मात्र यावर्षी मतदारांमध्ये स्थानिक उमेदवार असला पाहिजे, असा प्रचंड मोठा मतप्रवाह आपोआपच निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातीलच उमेदवार जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी ग्रामपंचायतपातळीपासून सुरू झाली आहे. याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्याही अनेक दिग्गज उमेदवारांना बसणार आहे. गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड मोठा आहे. १२ तालुके असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६०० वर अधिक गावे आहेत. त्यामुळे दहा ते पंधरा गावांचा मिळून एक जिल्हा परिषद मतदार संघ तयार करण्यात आला आहे. पेसा कायदा लागू झाल्याने अनेक क्षेत्र हे अनुसूचित जमाती भागात समाविष्ट झाले. कुरखेडा तालुक्यात विद्यमान ओबीसी राजकीय नेतृत्वाला यामुळेच हद्दपार व्हावे लागले. येथील काही उमेदवार लागूनच असलेल्या देसाईगंज तालुक्यात निवडणुकीच्या मैदानात आहे. तर गडचिरोली शहरात राहणारे काही उमेदवारही दुर्गम भागात तसेच गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन निवडणुकीच्या मैदानात आहे. कुरखेडा तालुक्यातून गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या महिला उमेदवार गडचिरोलीलगतच्या मतदार संघात यंदा निवडणूक लढत आहे. हे बाहेरचे उमेदवार स्थानिक उमेदवारांवर राजकीय अन्याय करणारे असल्याने यांना हटवा, असा प्रचंड मोठा प्रवाह मतदारांमध्ये दिसून येत आहे. आपल्या गावातील माणूस निवडून आल्यास आपल्या समस्या योग्यरितीने समजू शकेल, अशी भावना मतदारांमध्ये आहे. प्रचंड श्रीमंत व पैसेवाले लोक पैसा वाटून निवडून जातील, त्यानंतर पुन्हा गावाकडे पाठ फिरविणार नाही, अशी प्रतिक्रिया मुरखळा भागातील एका वृद्ध मतदाराने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक उमेदवारांनाच संधी देण्याची तयारी ग्रामस्थांनी चालविलेली आहे. यासाठी एक मोठे अभियान निवडणूक काळात हाती घेतले जाणार आहे. असा प्रचार व्यापक स्वरूपात झाल्यास गडचिरोली शहरात ऐशआरामात राहून केवळ निवडणुकीपुरतेच ग्रामीण भागात जाणाऱ्या दिग्गजांना मतदारराजा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
गृह तालुका सोडून इतरत्र लढणाऱ्यांसमोर संकट
By admin | Updated: February 3, 2017 01:19 IST