विसापूर येथील पाणीपुरवठा योजना सन २०१७-१८ या वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मंजूर केली आहे. जागेअभावी पाण्याची टाकी त्यावर्षी होऊ शकली नाही. विसापूर व विसापूर टोली येथे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत होती. येथील पाण्याची समस्या कायमची सुटावी याकरिता या वॉर्डाचे नगरसेवक तथा माजी पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड यांनी पाठपुरावा केला. ही योजना मंजूर व्हावी यासाठी नगरसेवक प्रमोद पिपरे व नगरसेवक निंबोड यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विसापूर प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सांगितली व निवेदन दिले. त्यामुळे टाकी व पाईपलाईनसाठी २ कोटी १६ लाख रुपयांची मंजुरी प्राप्त झाल्याचे नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी सांगितले.
गडचिरोली शहरातील वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाईपलाईनसाठी ५७ लाख रुपये असे एकूण २ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील वाढीव पाईपलाईनची कामे झालेली आहेत. विसापूर प्रभाग क्र.१० च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे कामाच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष पिपरे म्हणाल्या.
यावेळी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, बांधकाम सभापती प्रविण वाघरे, नगरसेवक तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, नगरसेवक केशव निंबोड, अभियंता भालेराव, कंत्राटदार रितेश गडपल्लीवार, संतोष मोगरकर, अनुराग पिपरे उपस्थित होते.
बाॅक्स .....
१० कोटी ४० लाखांची कामे
विसापुर टोली - पाथरगोटा ते वैनगंगा नदी घाटापर्यंत पांदन रस्ता (किंमत रुपये ४० लक्ष) मंजुर करून काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच संकुल परिसरातील विसापुर प्रभागात जवळपास १० कोटी रुपयांचा डांबरीकरण रस्ता पेव्हिंग ब्लॉकसहित, सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली बांधकाम, खुल्या जागेचे सौंदर्यीकरण, सोबतच विसापुर प्रभागात वाढीव इलेक्ट्रिक पोल, वायरिंग व नवीन एलईडी लावण्यात आले आहे.