वैरागड-करपडा बायपास मार्गाच्या बाजूला निवासी अंकुर आश्रमशाळा आहे. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच परिसरातील नागरिक केरकचरा आणून टाकतात. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे कचरा टाकला जाताे. त्यामुळे येथील दुर्गंधीचा त्रास शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना हाेत आहे. शिवाय याच मार्गाने शेतकरी आपल्या शेतीकडे व प्रवासी करपडा, लोहारा गावाकडे जातात. येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागताे. आश्रमशाळा प्रशासनाने वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले; परंतु काहीच उपयाेग झाला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास कचऱ्याचे ढीग आणखी माेठे हाेण्याची शक्यता आहे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास अधिक हाेऊ शकताे. त्यामुळे येथील ढगाची विल्हेवाट लावून आश्रमशाळेजवळ कचरा टाकण्यास प्रतिबंध घालावा.
-योगिता खंडारे, मुख्याध्यापिका, अंकुर आश्रमशाळा, वैरागड