गडचिरोली : जिल्हा परिषदेला चालू वर्षासाठी ३०५४ या शिर्षाखाली ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी १७ कोटी ५१ लाख ६२ हजार रूपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी १६ कोटी ९८ लाख रूपयांच्या कामाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. असे असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम सदर निधी पाच ते सहा महिन्यांपासून अखर्चीत राहिल्याचा मुद्दा उपस्थित करून जि.प.चा ३०५४ चा पाच कोटी रूपयांचा निधी राज्य सरकारच्या इतर विभागाकडे वळता व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी व जि.प.च्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्र पाठवून त्यांच्यावर दबाव आणत आहे, अशी माहिती जि.प.चे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जि.प.च्या ३०५४ च्या निधी अंतर्गत कामाचे नियोजन करण्याचा पूर्ण अधिकार जि.प. बांधकाम समितीला आहे. यात मात्र पालकमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे असताना ते जि.प.च्या कामात नाहक हस्तक्षेप करीत आहेत. जि.प.च्या बांधकाम विभागाने नियमानुसार घेतलेली कामे एप्रिल २०१६ पर्यंत थांबविण्यात यावी, असे पत्र पालकमंत्र्यांनी आपल्या स्वाक्षरीनुसार यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पाठवून जि.प.च्या विकासकामात अडथळा निर्माण केला आहे, असेही गण्यारपवार म्हणाले. जि.प.च्या कामात काही अनियमितता असल्याचा संशय असल्यास पालकमंत्र्यांनी कामाची तपासणी करावी, मात्र कामे थांबवू नयेत, असा सल्लाही गण्यारपवार यांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिला. (स्थानिक प्रतिनिधी)
पाच कोटी वळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा यंत्रणेवर दबाव
By admin | Updated: February 25, 2016 01:14 IST