शिष्यवृत्ती घोटाळा : आरोपींच्या नातलगांची तपास चौकशीची मागणीगडचिरोली शहरातील संकल्प सिध्दी बहुउद्देशीय संस्थेच्या सावित्रीबाई फुले टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेच्या केवळ एकाच पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. अन्य संस्थांच्या तीन ते चार पदाधिकारी, मुख्याध्यापक, लिपीक तसेच महिला कर्मचारी, संचालक यांच्यावर गडचिरोली व चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सावित्रीबाई फुले मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी संस्थेचे संस्थापक असलेल्या केवळ अमित अरविंद बंदेवरच कारवाई केली. या संस्थेच्या अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही. या कारवाईत पोलिसांनी पक्षपात केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. इतर संस्थांच्या बाबत मात्र कारवाई करताना पोलिसांनी दुजाभाव दाखविला नाही. संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संस्थेच्या कारवाईबाबत आर्थिक व्यवहार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांची बाजू घेतली असता, ते म्हणाले शिष्यवृत्ती प्रकरणाच्या तपासात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केलेला नाही. अमित बंदे यांच्या संकल्पसिध्दी बहुउद्देशीय संस्थेत सहभागी असलेल्या सर्व सभासद नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र यातील अनेक नातेवाईकांनी अमित बंदे याच्या विरोधात बयान दिले. या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. आमच्या स्वाक्षऱ्यासुध्दा कुठेही नाही, असे स्पष्ट केले. कागदपत्रांवरूनही ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे या संस्थेच्या संचालकांमध्ये केवळ अमित बंदेवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा कोणतीही पक्षपाती कारवाई करीत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ज्यांचा या घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. अशाच लोकांना आरोपी करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बंदेंच्या संस्थेवर कारवाई करण्यात पोलिसांकडून पक्षपात
By admin | Updated: May 18, 2015 01:42 IST