जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : गडचिरोलीत आढावा बैठक गडचिरोली : मनरेगा अंतर्गत प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्यास यंत्रणांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शुक्रवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत त्यांनी मनरेगाच्या कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जयंत पिंपळगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प व्यवस्थापक जे. पी. बाबरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची याला प्रमुख उपस्थिती होती. मनरेगा अंतर्गत विहिरींची कुशल कामे अनेक ठिकाणी अपूर्ण राहिलेली आहेत. या कामासाठी कुशल मजूर उपलब्ध नाहीत. त्यामुळे ती कामे प्रलंबित राहत असून यापुढील काळामध्ये प्राधान्याने ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना नायक यांनी यावेळी दिल्या. जॉबकार्ड तपासणी व जॉबकार्ड तयार करणे, त्यावर छायाचित्र जोडणे, त्या सर्वांची पूर्तता तातडीने करण्यात यावी याखेरीज मस्टर तयार होणार नाही असे निर्देश असतानाही याबाबत यंत्रणांनी काम केलेले नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढील काळात मनरेगाच्या ग्रामपंचायतनिहाय कामांची यादी आणि त्याची स्थिती असा आढावा सादर करा. तसेच जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना याबाबत लेखी सूचना द्या, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)
नरेगाची अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य द्या
By admin | Updated: February 4, 2017 02:14 IST