गडचिराेली : स्वमालकीची गुरे जंगलात चारून गावाकडे परत येत असताना जंगलातून अचानक रानटी हत्ती निघाले. कळपातील एका हत्तीने समाेर आलेल्या गुराख्याला साेंडेने उचलून रस्त्यालगतच्या पाटात आदळले. त्यानंतर पायाने तुडवून जागीच ठार केले. ही ह्रदयद्रावक घटना पाेर्ला वनपरिक्षेत्राच्या चुरचुरा बिटातील जंगलात बुधवार, १० सप्टेंबर राेजी सायकाळी ४:३० वाजेच्या सुमारास घडली.वामन माराेती गेडाम (६२) रा. चुरचुरा (मालगुजारी) ता. गडचिराेली, असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. वामन गेडाम हे नेहमीप्रमाणे स्वमालकीची गुरे चारण्यासाठी चुरचुरा- पिपरटाेला जंगलात सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेले हाेते. त्यांच्यासाेबत त्यांचा लहान भाऊ महादेव गेडाम व हिराेबी खाेब्रागडे हेसुद्धा हाेते. त्या दाेघांचीही जनावरे चराईसाठी हाेती. चुरचुरा- पिपरटाेला मार्गाच्या कडेला गुरे चारल्यानंतर सायंकाळी गुरे घराकडे घेऊन येत असताना जंगलातून दक्षिण दिशेने अचानक हत्ती निघाले. तेव्हा महादेव गेडाम व हिराेबी खाेब्रागडे हे जिवाच्या आकांताने पळाले. मात्र, वामन गेडाम हे हत्तीच्या तावडीत सापडल्याने हत्तीने रस्त्यावरून त्यांना साेंडेने पकडून रस्त्यालगतच्या पाटात आदळले. त्यानंतर पायाने तुडविल्याने गेडाम हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पाेर्लाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. सायंकाळी ७ वाजता शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
अन् अंदाज चुकला
वामन गेडाम व त्यांच्या साेबत्यांना हत्तींचा कळप रस्ता ओलांडून गेला, अशी माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी गावाच्या दिशेने गुरे वळविली व ते पिपरटाेला- चुरचुरा रस्त्यानेच गावाकडे परत येत हाेते. मात्र, काही हत्ती जंगलात हाेते. यापैकीच हत्तींनी वामन गेडाम यांना चिरडून ठार केले. वामन व त्यांच्या साेबत्यांनी संपूर्ण हत्ती उत्तर दिशेने म्हणजेच देशपूरच्या दिशेने गेल्याचा अंदाज लावला हाेता, मात्र ताे चुकल्याने ही ह्रदयद्रावक घटना घडली.