नोंदणीचे काम जाणले : लोकमत गडचिरोली कार्यालयाला भेटगडचिरोली : भारतासारख्या विस्तीर्ण लोकसंख्येच्या देशात महिला सक्षमीकरणाचे काम कसे चालते. याचा अभ्यास करण्यासाठी जपान येथील ‘जाप्स’ या संस्थेची शोको तनाका ही युवती गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. गडचिरोली येथील ‘रूदया’ या संस्थेच्या माध्यमातून त्या गडचिरोली जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या कामाचा अभ्यास करीत आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळी शोको तनाका यांनी गडचिरोली येथील लोकमत कार्यालयाला भेट दिली व लोकमत जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या सखीमंच सदस्य नोंदणीबाबतची माहिती त्यांनी जाणली. यावेळी लोकमत कार्यालयाचे प्रमुख डॉ. गणेश जैन व अभिनय खोपडे यांनी सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या पुढाकारातून लोकमत सखी मंचची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्र व गोव्यासह दीड ते दोन लाख महिला सदस्य सखी मंचशी जुळलेल्या आहेत. या माध्यमातून महिलांच्या व्यक्तीमत्त्व विकासाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. महिलांचे आरोग्य, सामाजिक प्रबोधन आदीवरही भर दिला जातो व महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकमत सखीमंच कायम प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. या सर्वबाबीची सुक्ष्म नोंद शोको तनाका यांनी घेतली व लोकमत वृत्तपत्र समुहाच्या सखीमंचच्या कामाची त्यांनी मुक्तकंठाने प्रसंशा केली. तसेच लोकमत वृत्तपत्र गडचिरोली येथे कसे तयार केले जाते, याचीही माहिती जाणली. यावेळी विनायक बोरकर, मयूर खंगार, सखीमंच संयोजिका प्रिती मेश्राम, नलिनी बोरकर, रश्मी आखाडे उपस्थित होते. गडचिरोली येथून तनाका बिजापूर व बेंगलोर येथे रवाना होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
लोकमत सखी मंचच्या कामाची जपानच्या युवतीकडून प्रशंसा
By admin | Updated: February 21, 2017 00:42 IST