लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १७ जानेवारीला संपूर्ण जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील मुलांना पाेलिओचा डोज देवून लसीकरण केले जाणार आहे. ही मोहिम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. पाेलिओ लसीकरणाच्या तयारीसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक मंगळवारी झाली. त्यात जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.साजिद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, डॉ. पंकज हेमके, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेळ उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील अपेक्षित ८९ हजार ७१० लाभार्थ्यांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. यामध्ये शहरी ८४७१ व ग्रामीण ८१२३९ लाभार्थी असणार आहेत. यासाठी १ लक्ष ६५ हजार आवश्यक पोलीओ लस उपलब्ध झालेली आहे. ग्रामीण २०९३ तर शहरी ४६ अशा २१४२ लसीकरण बुथवर पोलीओचे डोज दिले जाणार आहे. यामध्ये १३७ ठिकाणी बसस्टॅण्ड, रेल्वेठिकाण तसेच इतर ट्रान्झीट ठिकाणी पथके पोलीओ लसीकरण करणार आहेत. दुर्गम आदिवासी पाडयांवर लसीकरण करण्यासाठी ९५ फिरती पथके असणार आहे. यापुर्वी ११ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात ९७.८० टक्के, १० मार्च २०१९ रोजी ९९.१४ टक्के तर १९ जानेवारी २०२० रोजी ९७.४२ टक्के लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडली गेली होती. याहीवेळी मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारीआरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्रकारची खबरदारी घेवून लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. लहान मुलांच्या पालकांनी कोणत्याही प्रकारची शंका न घेता मास्क वापरुन शारीरिक आंतर पाळून आपल्या मुलांना पोलीओचा डोज द्यावा, असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. पाेलिओ बुथवर शारीरिक आंतर पाळून गर्दी न करता लसीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात १९९९ नंतर पोलीओ रुग्ण नाहीजिल्ह्यात २१ वर्षापूर्वी पाेलिओच्या रुग्णाची शेवटची नोंद झाली आहे. तसेच २०१४ यावर्षी जिल्ह्याला पोलीओ मुक्त जिल्हा म्हणूनही घोषित केले आहे. परंतु यावर्षी अफगाणिस्तानमध्ये ५४ तर पाकिस्तानमध्ये ८६ रूग्ण पाेलिओचे पोलीओचे आढळून आल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने पाेलिओ लसीकरण अजूनही पहिल्या इतकेच महत्वाचे असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही प्रकारचे मुलांचे लसीकरण हे मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असते. त्यामुळे मुलांना वेळेत लसीकरण आवश्यक आहे.