मालेवाडा/मुरूमगाव : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या सावरगाव तसेच मुरूमगाव पोलीस मदत केंद्रात पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध कामांचा ताण प्रचंड प्रमाणात आहे. येथील कर्मचाऱ्यांना आपल्या पगाराची रक्कम उचल करण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. मालेवाडा पोलीस मदत केंद्रातील पोलिसांना बोअरवेलचे पाणी पिऊन देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज राहावे लागत आहे.मालेवाडा पोलीस मदत केंद्रात राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनची पार्टी कंपनी कार्यरत आहे. असिस्टंन्ट कमांडंट राजीव रतन यांच्या नेतृत्त्वात ही कंपनी आपला लढा लढत आहे. जागेची कमतरता असून वनविभागाकडे जागेची मागणी केली आहे. दोन व्हालीबॉल ग्राऊंडवर खेळण्याचा सराव केला जातो. महाराष्ट्र सीमेवर अतिदुर्गम भाग असलेल्या सावरगाव पोलीस मदत केंद्राची निर्मिती २ जानेवारी २०१३ ला करण्यात आली. सद्य:स्थितीत येथे बांधकाम सुरू आहे. मुरूमगाव येथून भ्रमणध्वनीचे पुढे कव्हरेज नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्यास नेहमीच अडचणी येतात. या सर्व बाबीनंतर पगार उचलण्याचे काम करण्यासाठीही त्यांची पायपीट होते. एटीएम कार्ड दुसऱ्यांना देऊन कुटुंबापर्यंत पैसे पोहोचवून द्यावे लागतात. शिवाय राहण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालय आदी सुविधाही येथे अपुऱ्या प्रमाणात आहे. सावरगाव येथे पोलीस मदत केंद्रात चार पोलीस अधिकारी, ३८ कर्मचारी, सीआरपीएफ व एसआरपीएफचे एक प्लाटून कार्यरत आहे. मुरूमगाव येथे चार पोलीस अधिकारी व ४० कर्मचारी, सीआरपीएफ ११३ बटालियनचे १२५ जवान, एसआरपीएफचे एक वरिष्ठ अधिकारी व २५ जवान कार्यरत आहेत.
पगारासाठी पोलिसांची पायपीट
By admin | Updated: January 22, 2015 01:05 IST