एसीबीने पोलीस ठाण्यातच रचला सापळा गडचिरोली : एका संशयित आरोपी महिलेवर कारवाई न करण्यासाठी तिच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यातील हवालदार किशोर पुरुषोत्तम मिरगे यास रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस हवालदार मिरगे याला बुधवारी गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती एसीबी गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक एम. एस. टेकाम यांनी लोकमतला दिली. तक्रारकर्ती महिला ग्रामीण भागातील रहिवासी आहे. शेतीकाम करुन ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ६ आॅगस्ट रोजी गावातील पोलीस पाटलाने तिला गावातील व्यसनमुक्ती समितीचे लोक तुझ्या विरुद्ध तक्रार करणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसह गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी आली असता, बीट जमादार किशोर मिरगे याने तिचे म्हणणे ऐकून न घेता कारागृहात डांबण्याची धमकी दिली. काही वेळानंतर मिरगे याने कारवाई न करण्यासाठी तिला ५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्या महिलेने आपण गरीब असून, एवढे पैसे देऊ शकत नाही, असे सांगितले. तरीही मिरगे याने पुन्हा तिच्याकडे २ हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोड करुन १ हजार रुपये स्वीकारण्यास तो तयार झाला. मात्र लाच देण्याची तक्रारकर्त्या महिलेची मुळीच इच्छा नसल्याने तीने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात सापळा रचला. यावेळी पोलीस ठाणे संकुलासमोरील पानटपरीशेजारी तक्रारकर्त्या महिलेकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हवालदार किशोर मिरगे यास रंगेहाथ पकडले. एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम. एस. टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकार, सोनल आत्राम व घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली. (स्थानिक प्रतिनिधी)
लाचखोर पोलीस हवालदारास पोलीस कोठडी
By admin | Updated: August 11, 2016 01:22 IST