तलाव कोरडे : जलसंकट तीव्र होणारजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर तसेच इतर भागातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने पाण्यासाठी या भागात पाळीव व वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. जंगल व गाव परिसरातील सर्वच पाणी स्रोत कोरडे पडल्याने पाळीव व वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे.जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथे कक्ष क्रमांक ७१ मध्ये संपूर्ण गावातील नागरिकांच्या वापरासाठी एकमेव लहान तलाव या तलावातील पाण्याचा उपयोग शेती सिंचन सुविधा, बंगाली बांधवांची आंघोळ तसेच वन्य व पाळीव प्राण्यांना तहाण भागविण्यासाठी होतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शंकरनगर येथील एकमेव तलावातील पाणी आटले आहे. या तलावात फारच कमी पाणी उपलब्ध आहे. १५ वर्षांपूर्वी आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी शंकरनगर येथे सदर तलावाची निर्मिती केली. तेव्हापासून कोणत्याही यंत्रणेने या तलावाची दुरूस्ती केली नाही. वन विभाग अथवा इतर प्रशासकीय यंत्रणेने जलशिवार योजनेतून या तलावाचे खोलीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
पाण्यासाठी पाळीव व वन्य प्राण्यांची भटकंती
By admin | Updated: April 11, 2016 01:40 IST