गडचिरोली : कॅन्टोन्मेंट विभागाबरोबरच महापालिका, नगर पालिका हद्दीतही पेट्रोल व डिझेलवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारणीच्या विरोधात पेट्रोल डिलर असोसिएशनच्यावतीने आज सोमवारी राज्यभरात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले. गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील पेट्रोलपंप सोमवारी दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने पेट्रोल डिझेलची टंचाई भासली. यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.कॅन्टोन्मेंट विभागामध्ये पेट्रोल व डिझेलवर एलबीटी कर न आकारण्याबाबत आदेश काढण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल अत्यावश्यक घटकामध्ये येत असल्याने पेट्रोल, डिझेलवर एलबीटी कर लावू नये, अशी मागणी पेट्रोल, डिलर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. डिझेल व पेट्रोल या अत्यावश्यक गोष्टी आहे. त्यामुळे या वस्तुवरील एलबीटी कर हटविण्यात आला तर नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे, असाही आशावाद अनेक पेट्रोल डिलरने व्यक्त केला आहे. एलबीटी कर रद्द करण्यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आज गडचिरोली जिल्ह्यात दिवसभर पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले. यामुळे जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातही पेट्रोलची टंचाई जाणवली.(प्रतिनिधी)
जिल्हाभरात पेट्रोलपंप बंद
By admin | Updated: August 11, 2014 23:54 IST