लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथे पक्के रस्ते, नालीचे बांधकाम झालेले नाही. गावात अनेक समस्या आहेत. त्यामुळे या समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोटापल्ली येथील काही वॉर्डात २० वर्षांपूर्वी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. नाल्या पूर्णपणे तुंबल्यामुळे दुर्गंधी येत आहे. येथे ग्रामपंचायत असूनसुद्धा गावाचा विकास झालेला नाही. कोटापल्ली गावात २० वर्षांपूर्वी काही वॉर्डात नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर नवीन वस्ती वाढली; पण नवीन वॉर्डात अजूनपर्यंत नालींचे बांधकाम झालेले नाही. नाल्यांचा अभाव असल्याने बहुतांश ठिकाणी सांडपाणी साचून असते. बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत आहे. गावात रोगराई पसरण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. गावातील रस्ते पूर्णपणे उखडलेले आहेत. येथील काही नागरिकांच्या घरासमोर कचरा दिसतो.
कार्यालयाला ग्रामसचिवांची दांडी
- शंकर गग्गुरी यांच्या घरासमोर असलेल्या घाणीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक वेळा सांगूनही नाली सफाईकडे लक्ष दिल्याने शंकर गग्गुरी यांनी स्वतः नालीतील घाण स्वच्छ केली.
- विशेष म्हणजे, येथील ग्रामसचिव मुख्यालयात राहत नाहीत. ते सातत्याने गैरहजर असतात. त्यामुळे गाव विकासात अडथळे येत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्षच झाले, असा आरोप नागरिकांचा आहे.
निधी खर्च होतो कुठे ?
- रस्ते, नाली, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कोटापल्लीवासीयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वातंत्र्याची सात दशके उलटूनही गावांमध्ये योग्य रस्ता नाही.
- पावसाळ्यात रस्त्यावर चिखल पसरलेला असतो. त्यामुळे गावातून साधी दुचाकीसुद्धा जाऊ शकत नाही. नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो; परंतु या समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करतात.
- शासनाकडून मिळणारा निधी खर्च कुठे होतो, असा आरोप नागरिकांचा आहे.