शिक्षण सचिवांकडे मागणी : शिक्षक संघटनांचे निवेदनगडचिरोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे विविध प्रशिक्षण उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये घेतले जाते. परंतु १५ मे ते २५ जून या कालावधीत विदर्भात कडक उन्हाळा असतो, त्यामुळे २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत विदर्भातील शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, माध्यमिक व उच्च माध्यमिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कडक उन्हाळ्याच्या कालावधीत प्रशिक्षण केंद्रावर पुरेशा थंड पाण्याची सोय नसते. शिवाय कुलरचीही व्यवस्था नसते. या समस्यांविषयी संबंधित अधिकाऱ्यांनाही शिक्षक बोलू शकत नाही. कडक उन्हाळ्यात प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे आजार, ब्रेन हॅमरिंगसारख्या घटना घडतात. अनेकदा शिक्षकांचा मृत्यूही होऊ शकतो. अशा घटनाही घडलेल्या आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण कडक उन्हाळ्यात न घेता, पूर्वीच घेण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत उन्हाळा कडक राहत नसतो. शिवाय शालेय अभ्यासक्रम व परीक्षाही आटोपल्या असतात. त्यामुळे या कालावधीत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष एम. एन. चलाख, डॉ. पं. दे. शि. प. चे जिल्हा सचिव के. एन. रडके, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. के. खरवडे, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे डॉ. नामदेव खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष हेमराज उरकुडे, जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव टी. के. बोरकर, अध्यक्ष संजय नार्लावार, विज्युक्टाचे सचिव धमेंद्र मुनघाटे, विलास बल्लमवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
२५ एप्रिलनंतर शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करा
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST