ग्राहक मंचाचा निर्णय : भूखंड खरेदी प्रकरणगडचिरोली : महेश माधव येनप्रेड्डीवार यांनी शोभा नारायण म्हस्के यांच्याकडून भूखंड खरेदी प्रकरणात घेतलेली रक्कम २० हजार रूपये ११ जानेवारी २०१४ पासून आठ टक्के व्याजासह ४५ दिवसाचे आत द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच गडचिरोलीने २९ जानेवारी २०१५ रोजी दिला आहे. शोभा नारायण म्हस्के रामनगर गडचिरोली यांनी महेश माधव येनप्रेड्डीवार स्नेहलनगर गडचिरोली यांच्याकडून लांझेडा येथील सर्वे नंबर ३५ बाय २ लेआउटमधील प्लॉट नंबर सहा व सात मिळून प्लॉट नंबर सातवर नमूद करून ३४०० चौ.फु. रूपये १३ लाख ६० हजारात विकत घेण्याचा सौदा केला होता. येनप्रेड्डीवार यांनी ११ जानेवारी २००४ रोजी शोभा म्हस्के यांच्याकडून २० हजार रूपये बयाणादाखल घेतले. उर्वरित रक्कम नोंदणीप्रसंगी देऊन १ एप्रिल २०१४ रोजी विक्री करून देण्याचे ठरले. २ फेब्रुवारी २०१४ रोजी प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी व मोजणी केली असता, प्लॉटचे क्षेत्रफळ व हद्दी बदलून त्यामध्ये बदल केल्याचे दिसून आले. लेआउटप्रमाणे मोक्यावर हद्दी दिसून न आल्याने महेश येनप्रेड्डीवार यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. तसेच दाखविलेले लेआउट अकृषकही झालेले नाहीत. म्हणून शोभा म्हस्के यांनी येनप्रेड्डीवार यांना २० हजार रूपयाची रक्कम व्याजासह देण्याबाबत प्रकरण दाखल केले. त्यावर ग्राहक मंचाने निर्णय दिला.
आठ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश
By admin | Updated: January 31, 2015 23:20 IST