भूमी अभिलेख कर्मचाऱ्याचा प्रताप : अन्यायग्रस्तांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारदेसाईगंज : स्थानिक कस्तूरबा वार्डातील न्यायप्रविष्ठ असलेल्या जागेची भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने न्यायालयाच्या आदेशानुसार मोजणी केली़ मात्र चुकीची मोजणी करून अतिक्रमण काढल्यामुळे या जागेवर रहिवासी असलेल्या कुटुंबाला उघड्यावर यावे लागले आहे़ संबंधित महिला सर्वेअरची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून पिलारे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.प्लॉटच्या जागेबाबत दीपक पिलारे व प्रशांत पिंजरकर यांच्यातील वादाचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ होते़ त्यानुसार न्यायालयाने पिंजरकर यांना त्यांची २४०० चौ. फूट जागा द्यावी, असा आदेश दिला. आदेशानुसार दीपक पिलारे सुध्दा जागा द्यायला तयार झाले़ परावर्तीतभूमी खसरा क्र. १५४/१, १५४/१९, १५७/८ मधील प्लॉट क्र. ५६ ची २४०० चौ. फूट जागा संबंधिताला स्थानिक भूमापन कार्यालयाने मोजून द्यावयाची होती. त्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयातील महिला सर्वेअर खोब्रागडे यांच्याकडे मोजणीचे काम देण्यात आले़ प्रत्यक्ष जागेवर मोजणी करीत असताना संबंधिताला देय असलेल्या जागेची मोजणी करून २४०० चौ. फूट जागा द्यायला पाहिजे होती़ मात्र सर्वेअरने त्या जागेलगत मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण असलेल्या नझूलच्या जागेतील रहिवासी प्रयोजनाकरिता असलेले घर व संरक्षण भिंत देखील पाडली. चुकीची मोजणी करून अतिक्रमण काढल्यामुळे दीपक पिलारे यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष प्लॉटच्या जागेची पुनर्रमोजणी करून संबंधित सर्वेअरवर कारवाई करावी, अशी मागणी दीपक पिलारे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)
चुकीच्या मोजणीमुळे कुटुंब उघड्यावर
By admin | Updated: April 16, 2015 01:46 IST