लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची प्रकरणे राज्यभर चर्चेत असताना आता गडचिरोलीत एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची दोन वेगवेगळी अपंगत्व प्रमाणपत्रे समोर आली आहेत. यासंदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी १५ डिसेंबर रोजी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
तक्रारीमध्ये पाचखेडे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा दावा महीवार यांनी केला आहे. सेवा पुस्तिकेत एका प्रमाणपत्रात ६५ टक्के अपंगत्व, तर दुसऱ्या प्रमाणपत्रात ४८ टक्के अपंगत्व दाखवल्याचे नमूद करत मद्दीवार यांनी दोन्ही प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती तक्रारीसोबत जोडल्या आहेत. हा सर्व प्रकार गैरमार्गाने झाल्याचा त्यांचा संशय आहे. गोंदियात पाचखेडे यांच्या कार्यकाळात कथित ट्रॅक्टर खरेदी घोटाळा, महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन, त्यातून विशाखा समितीकडे झालेली तक्रार व गडचिरोलीत झालेले गैरव्यवहाराचे आरोप याचाही तक्रारीत उल्लेख आहे. विशेष म्हणजे पाचखेडे यांना २१ नोव्हेंबरला एकतर्फी कार्यमुक्त करुन उचलबांगडी केली होती.
कठोर कारवाईची मागणी
मद्दीवार यांनी या सर्व गैरप्रकाराबाबत दोन्ही प्रमाणपत्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन पाचखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीने खळबळ उडाली आहे.आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत श्रीराम पाचखेडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Web Summary : Gadchiroli district planning officer faces allegations of possessing two different disability certificates. A BJP official has filed a complaint with the Chief Minister, alleging misuse and demanding action. Previous misconduct allegations are also under scrutiny.
Web Summary : गडचिरोली के जिला नियोजन अधिकारी पर दो अलग-अलग विकलांगता प्रमाणपत्र रखने का आरोप है। भाजपा अधिकारी ने मुख्यमंत्री से शिकायत कर दुरुपयोग का आरोप लगाया और कार्रवाई की मांग की। पिछले कदाचार के आरोप भी जांच के दायरे में हैं।