गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा एप्रिल ते मे महिन्यांदरम्यान घेण्यात येणार आहे. मात्र, काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे यावर्षी परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. दीड हजारांवर विद्यार्थ्यांनी यावर्षी बाेर्डाच्या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
शैक्षणिक जीवनाचा व करिअरचा टर्निंग पाॅइंट समजल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परीक्षा यशस्वी केल्यानंतर पुढील शैक्षणिक वाटचाल व करिअरचा मार्ग सापडत असताे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही या परीक्षांना प्रचंड महत्त्व देतात. इतकेच नव्हे, तर यश व करिअरसाठी झपाटून जाऊन या परीक्षेत भरघाेस यश मिळविण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम करतात.
पहिले शैक्षणिक सत्र संपल्यावर दिवाळीनंतर बाेर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरून नाेंदणी करावी लागते. मात्र, यावर्षी काेराेनामुळे सात ते आठ महिने शाळा बंद राहिली. काेराेना संसर्गाचा प्रसार हाेऊ नये, याकरिता खबरदारी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन शिक्षण पद्धती राबविण्यात आली. स्मार्ट फाेन व व्हाॅटस्ॲपच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. मात्र, ही शिक्षण पद्धती फारसी प्रभावी ठरली नाही. दरम्यान, शासनाच्या वतीने निर्णय झाल्यावर दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास सुरुवात झाली.
काेराेनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरले नाहीत. विद्यार्थ्यांसह पालकांचे दुर्लक्ष झाले. परिणामी, यावर्षी बाेर्डाची परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
बाॅक्स...
दहावीचे परीक्षार्थी
१५,१०३
२०२०
..............
१३,५८२
२०२१
बारावीचे परीक्षार्थी
१२,२०१
२०२०
...............
१०,६०२
२०२१
बाॅक्स....
पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या ३७० वर
- इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेत मागील शैक्षणिक सत्रात नापास झालेल्या मात्र यावर्षी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३७० पेक्षा अधिक आहे. दरवर्षी पुनर्रपरीक्षार्थ्यांची संख्या यापेेक्षाही अधिक असते. मात्र, काेराेना संसर्गामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरले नाही. पुनर्परीक्षार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग नव्हता. घरीच अभ्यास करून तयारी करावी लागत हाेती. त्यामुळे यावर्षी पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या घटली आहे.
- सन २०२० मध्ये गतवर्षी एकूण १५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची बाेर्डाची परीक्षा दिली. यावर्षी ही संख्या कमी झाली असून, १३ हजार ५८२ परीक्षार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षी २०२० मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेला १२ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यावर्षी काेराेनामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटली असून, ती १० हजार ६०२ इतकी आहे.