देसाईगंज : वेतन थकल्यामुळे त्रस्त झालेल्या बिहीटेकला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुधीर डोमाजी वसाके रा. कोंढाळा यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रूग्णालयात ग्रामसेवक सुधीर वसाके यांचा मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. वसाके यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे कोरचीचे बीडीओ डी. एम. वैरागडे व पंचायत विस्तार अधिकारी ठाकरे यांच्यावर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व वसाके कुटुंबीयांनी मृतदेहासह देसाईगंजचे एसडीपीओ कार्यालय गाठून तिथे ठिय्या मांडला. ग्रामसेवक वसाके यांचा मृत्यू झाल्याचे कळताच जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, देसाईगंजचे पं.स. उपसभापती नितीन राऊत यांनी ब्रह्मपुरीचे रूग्णालय गाठून वास्तविक परिस्थिती वसाके कुटुंबीयांकडून जाणून घेतली. त्यानंतर ग्रामसेवक वसाके यांचा मृतदेह घेऊन देसाईगंजचे एसडीपीओ कार्यालय गाठले. यावेळी एसडीपीओ अभिजीत फस्के यांना लेखी तक्रार देऊन ग्रामसेवक वसाके यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी केली. एसडीपीओ फस्के यांच्याशी ग्रामसेवक मृत्यू प्रकरणाबाबत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व वसाके कुटुंबीयांनी चर्चा केली. (वार्ताहर)४ग्रामसेवक वसाके यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले कोरचीचे बीडीओ व पंचायत विस्तार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही ग्रामसेवक वसाके यांचा मृतदेह कार्यालय परिसरातून उचलणार नाही, असा पवित्रा पदाधिकारी व कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत वसाके यांचा मृतदेह कार्यालय परिसरातच ठेवला होता.४जि.प. कर्मचारी महासंघ, ग्रामसेवक संघटना, लोकप्रतिनिधी व कुटुंबीयांच्या आक्रमक पवित्र्यामुळे देसाईगंजचे एसडीपीओ अभिजीत फस्के यांनी संबंधित दोषींवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश कोरचीच्या पोलीस निरीक्षकाला दिले.
पदाधिकारी व कुटुंबीयांचा एसडीपीओ कार्यालयात ठिय्या
By admin | Updated: March 23, 2016 01:55 IST