धानोरा : गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासी समाजावर सतत अन्याय करण्यात आला. ओबीसींसह एनटी, व्हीजे समाजाचे आरक्षण कमी करण्यात आले. त्यामुळे या समाजाच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी गैरआदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याकडे सतत दुर्लक्ष केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत धानोरा तालुक्यातील गैरआदिवासी समाजाच्यावतीने नोटा या पर्यायाचा वापर केला जाईल, अशी माहिती विविध समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक माळी समाज भवना आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गडचिरोली जिल्ह्यात जमीनदारी काळापासून गैरआदिवासी समाज मूळचा रहिवासी आहे. आदिवासी समाजाकडून गैरआदिवासींनी विकत घेतलेल्या जमिनी परत आदिवासींना मिळाल्या. त्यामुळे जमिनीवर उपजीविका करणाऱ्या गैरआदिवासी समाजावर उपासमारीचे संकट कोसळले. या संकटातून सावरल्यानंतर गैरआदिवासींनी काबाडकष्ट करून जमिनी प्राप्त केल्या. परंतु आता जिल्ह्यातील ओबीसींसह एनटी व व्हीजे यांचे आरक्षण कमी झाल्याने पुन्हा पेसाची अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातील गैरआदिवासींच्या नोकऱ्या सरकार हिरावू पाहात आहे. त्यामुळे शासनाप्रती गैरआदिवासींमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करता नोटा पर्यायाचा वापर धानोरा तालुक्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत गैरआदिवासी समाजाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष राजु मोहुर्ले, माळी समाजाचे अध्यक्ष मुकाजी भेंडारे, शिवराम चिमुरकर, भास्कर सोनुले, मधुकर रामपुरकर, अर्जुन सोमनकर, मारोती मेश्राम, ज्ञानेश्वर भुरसे, सदाशिव सहारे, मनोहर गावतुरे, संदीप तोंडरे, गणू लोणबले, हिवराज सोनुले, नामदेव गुरनुले, अनिल मोहुर्ले, नाना पाल, विनोद लेनगुरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
धानोरातील गैरआदिवासी आक्रमक
By admin | Updated: October 13, 2014 23:20 IST