लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जानेवारी महिन्यात केवळ जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे सुरू केलेली शिवभोजन थाळीची सुविधा आता गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी आणि कुरखेडा या चार तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक तालुका मुख्यालयी शिव भोजन सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा या ठिकाणी शिवभोजनाचे प्रस्ताव आले होते. त्यांची तपासणी करून त्या ठिकाणी शिवभोजनाची परवानगी देण्यात आली. संचारबंदीदरम्यान गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे, म्हणून शासनाने या योजनेचा तालुकास्तरावरही विस्तार केला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावरील पुरवठा शाखेकडे संबंधित इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.गडचिरोलीत केंद्र वाढवागडचिरोलीत सध्या चामोर्शी मार्गावरील एका कॉम्प्लेक्समध्ये शिवभोजन केंद्र चालविले जाते. याच केंद्राकडून तात्पुरत्या स्वरूपात महिला व बाल रुग्णालयातही व्यवस्था केली आहे. याशिवाय आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात अशाच पद्धतीचे केंद्र द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांसाठी ही सोय करण्याची मागणी केली जात आहे.समिती करणार अंतिम निवडभोजनालय चालविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस तसेच ज्या-ज्या ठिकाणी गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ असेल अशा ठिकाणी असणाऱ्यांना शिवभोजन सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. किमान २५ व्यक्तींच्या जेवणाची बैठक व्यवस्था, अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र, नगर परिषदेचे गुमास्ता प्रमाणपत्र, स्वतंत्र स्वयंपाकगृह व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी गोष्टींची पूर्तता करणारे लोक यासाठी पुढाकार घेऊ शकतात. त्यांची अंतिम निवड उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपालिका क्षेत्र असल्यास नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्या समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले.मर्यादित थाळी झाली अमर्यादितही योजना सुरू करताना जिल्ह्याच्या ठिकाणी केवळ २०० थाळ्या तर तालुकानिहाय ७० थाळ्यांची मर्यादा दिली होती. मात्र कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आता अमर्यादित थाळया देण्यात येत आहेत. गरजू लोकांना अन्न मिळावे या उद्देशाने सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ही सुविधा गरजू लोकांसाठी उपलब्ध राहणार आहे.
आता चार तालुक्यांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:01 IST
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक तालुका मुख्यालयी शिव भोजन सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा या ठिकाणी शिवभोजनाचे प्रस्ताव आले होते. त्यांची तपासणी करून त्या ठिकाणी शिवभोजनाची परवानगी देण्यात आली. संचारबंदीदरम्यान गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे, म्हणून शासनाने या योजनेचा तालुकास्तरावरही विस्तार केला आहे.
आता चार तालुक्यांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र
ठळक मुद्देमर्यादित थाळ्यांची अटही शिथिल : सर्वच तालुक्यांमध्ये सुरू करण्याचे नियोजन