महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या वतीने सन २०१५-१६ मधील पावसाळ्यापासून जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिका अंतर्गत शासकीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या आवारात २० रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करावयाचे आहे. या कार्यक्रमानुसार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनानंतर घेण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेने सदर झाडे लावल्यानंतर त्यातील किमान ८० टक्के रोपे जीवंत ठेवण्याची व त्याचे रक्षण करून पाणीपुरवठा व कायमस्वरूपी देखभाल करण्याची जबाबदारी व संगोपणाची व्यवस्था शाळेने करावयाची आहे. केंद्र सरकारच्या हरितसेनेच्या धर्तीवर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहा विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गट पर्यावरण रक्षक सेना म्हणून तयार करून त्याच्या गटप्रमुखावर ही जबाबदारी द्यावयाची आहे. या कार्यक्रमात ज्या शाळांची कामगिरी उत्तम असले त्यांना प्रोत्साहन म्हणून योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून मूल्यांकन करून तालुका / जिल्हा / विभागस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस योजना, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील शाळांनी सहभागी होऊन हरितसमृद्धीच्या कामास हातभार लावावा, असे आवाहन उपसंचालक सामाजिक वनीकरण यांनी केले आहे. या उपक्रमामुळे यंदा जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम वाढतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आता शाळांमध्ये तयार होणार पर्यावरण रक्षक सेना
By admin | Updated: July 11, 2015 02:25 IST