गडचिरोली : नऊ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हा निरिक्षक म्हणून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सूत्र सोपविले आहे. त्यामुळे राऊत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पक्षाचे नगर पंचायत निवडणुकीचे तिकीट वाटप करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची धूरा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पक्षाच्या पडतीच्या काळात डॉ. उसेंडी यांनी पक्षाला नवसंजीवणी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तरूण नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना पक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना धक्का देण्याचे काम सुरू केले होते. जिल्हा अध्यक्षांना विश्वासात न घेता परस्पर पक्षात कार्यकर्ते व नेत्यांचे प्रवेश देणे सुरू झाले होते. या गंभीर बाबी संदर्भात जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे थेट नाराजी नोंदविली होती. आगामी काळात नगर पंचायती निवडणुका असल्याने ही बाब पक्षासाठी हितावह नाही, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. ज्यांच्याकडे या जिल्ह्याची धूरा नाही. ते नेते वारंवार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कारभारात हस्तक्षेप करीत आहेत, ही बाबही प्रकर्षाने प्रदेश काँग्रेस समोर मांडण्यात आली होती. या सर्व बाबीची गंभीर दखल घेत माजी मंत्री नितीन राऊत यांना गडचिरोली जिल्हा निरिक्षक पदाचा भार देण्यात आला आहे. आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये नितीन राऊत हे निरिक्षक म्हणून काम करणार असून माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम या सर्व नेत्यांशी नितीन राऊत यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे पक्षातील गटबाजीलाही लगाम लावण्याचे काम ते करू शकतात, असा प्रदेश काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज आहे. त्यानुसार राऊत यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असावी, अशी शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेस निरिक्षक पदी माजी मंत्री नितीन राऊत यांची नेमणूक झाल्याच्या बाबीला जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी दुजोरा दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बाप, बेटे निरीक्षकमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून डॉ. नितीन राऊत यांची नेमणूक केली आहे. तर त्यांचे सुपुत्र कुणाल राऊत हे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी पूर्वीपासूनच पाहत आहे. यापूर्वी कुणाल राऊत यांनी दोन ते तीन वेळा जिल्ह्याचा दौरा करून येथील परिस्थिती जाणून घेतली व युवक काँग्रेसमध्ये व्यापक फेरबदल केले. त्यामुळे डॉ. नितीन राऊत यांच्याकडून काँग्रेसजणांना फार मोठ्या आशा निर्माण झाल्या आहे.
नितीन राऊत यांच्याकडे काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षक पदाची धुरा
By admin | Updated: October 3, 2015 01:18 IST